उन्हाळी हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला लागवड | cultivation of various vegetables during the summer season in Maharashtra.

 उन्हाळी हंगामातील वेलवर्गीय भाजीपाला लागवड


महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने वेलवर्गीय भाज्या काकडी, दोडका, घोसाळी, कारली, दुधी भोपळा, ढेमसे, तांबडा भोपळा, कलिंगड, खरबूज इ. उन्हाळी भाजीपाला पिके घेतली जातात. वेलवर्गीय भाजीपाला पिकाची लागवड करण्यापूर्वी आणि अधिक चांगले दर्जेदार उत्पन्न मिळविण्यासाठी तांत्रिक बाबींचा बारकाईने विचार करून सुयोग्य नियोजन करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरामुळे उत्पन्नामध्ये वाढ होऊन चांगला फायदा होतो. त्यासाठी लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत विविध प्रकारच्या बाबी विचारात घ्याव्या लागतात. उदा. जमिनीची निवड, हवामानाचा परिणाम, योग्य पिकाची निवड, सुधारित आणि संकरित वाणांचा वापर, योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, संजीवकाचा वापर, पीक संरक्षण, फळांची काढणी, प्रतवारी आणि मार्केटिंग इत्यादी.

वेलवर्गीय पिकांची लागवड वर्षातून दोन हंगामात केली जाते. खरीप व उन्हाळी हंगाम खरीप हंगामात जून-जुलै महिन्यात तर उन्हाळी हंगामात जानेवारी-फेब्रुवारी मध्ये करतात. उन्हाळी हंगामाकरिता साधारणपणे १४ जानेवारीनंतर सर्व वेलवर्गीय भाजीपाला पिकांची वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड बियांपासून करतात त्यामुळे, ल लागवडीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डॅझीम ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात घेऊन बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.

सरी पद्धतीमध्ये रिजरच्या साहाय्याने सऱ्या पाडून सऱ्यांच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला ठरावीक अंतरावर ३ ते ४ बिया टोकून लावतात. संपूर्ण बियाण्याची उगवण झाल्यावर प्रत्येक ठिकाणी दोन रोपे ठेवून बाकीची रोपे उपटून टाकावीत.

पिकांना आधार देणे : 



 कारली, काकडी, दोडका, घोसाळी, पडवळ या पिकांना ताटी पद्धतीने आधार देतात आणि दुधी भोपळा या पिकाला मंडप करतात.

- ताटी पद्धत :  या पद्धतीमध्ये ६३ फुटांवर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात, यासाठी रीजरच्या साहाय्याने ६ फूट अंतरावर सरी पाडावी व प्रत्येक २५ फूट अंतरावर आडवे पाट तयार करावेत. सऱ्यांच्या लांबीच्या दोन्ही टोकाला १० फूट उंचीचे व ४ इंच जाडीचे डांब शेताच्या बाहेरच्या बाजूला झुकतील या पद्धतीने २ फूट जमिनीत गाडावे.

- मंडप पद्धत :  या पद्धतीमध्ये मंडप तयार करतात. दोन ओळीतील अंतर १० ते १२ फूट आणि दोन वेलीतील अंतर ३ फूट ठेवून या वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. त्यासाठी १० ते १२ फूट अंतरावर रीजरच्या साहाय्याने सरी पाडावी. नंतर पाणी चांगले बसण्याच्या दृष्टीने जमिनीच्या उतारानुसार दर २० ते २५ फूट अंतरावर आडवे पाट पाडावे व पाणी एकसारखे बसेल अशा पद्धतीने रान बांधून घ्यावे. मंडपाची उभारणी करताना शेताच्या सर्व बाजूंनी प्रत्येक ५ ते ६ फूट अंतरावर १० फूट उंचीचे ४ इंच जाडीचे लाकडी डांब शेताच्या बाहेरील बाजूने झुकतील अशा पद्धतीने दोन फूट जमिनीत गाडावेत. डांब गाडण्यापूर्वी डांबाचा जो भाग जमिनीत गाडावयाचा त्या भागावर डांबर लावावे म्हणजे डांब कुजणार नाहीत.

मंडप तयार झाल्यानंतर ८ फूट उंचीची सुतळी घेऊन त्याचे एक टोक वेलाच्या खोडाजवळ तिरपी काडी रोवून त्या काडीस वेल बांधावे. त्या सुतळीस पीळ देऊन दुसरे टोक वेलीवरील तारेस बांधावे. वेल सुतळीच्या साहाय्याने वाढत असताना बगलफूट व तणावे काढावे पाने काढू नये, मुख्य वेल मंडपावर पोहचल्यानंतर त्याचा शेंडा खुडावा व राखलेल्या बगलफुटी वाढू द्याव्यात.

1. मंडपासाठी लाकडी बल्या तारा (१४ गेज, १० गेज)

२. ८ ते १० फूट लांब, १० सेंमी गोल

३. चारी बाजूंनी ताण द्यावा

४. १० गेज तार आडवी-उभी बांधावी

५. एका एकरासाठी साधारणपणे ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो.


आंतरमशागत :


  1. खुरपणी/निंदणी करणे :  वेलवर्गीय भाजीपाला पिकाची मुळे फार खोलवर जात नाहीत त्यामुळे बी उगवून वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत वेलाच्या आजूबाजूचे तणे काढून रान भुसभुशीत ठेवणे जरुरीचे आहे. कारण वेल वाढून जमिनीवर पसरू लागला म्हणजे तण काढणे अवघड जाते. पण पांढऱ्या फुली/गाजरगवतासारखे तण हाताने उपटून काढावे. शेत तणमुक्त ठेवण्यासाठी १ ते २ खुरपणी करून तणांचा बंदोबस्त करावे.
  2.  विरळणी करणे : लागवडीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी अंकुर फुटून वेल वाढू लागतो. प्रत्येक ठिकाणच्या दोन जोमदार वेली ठेवून बाकीच्या काढून टाकाव्यात.
  3.  आधार देणे : वेलवर्गीय पिकांना वाढीसाठी आधाराची गरज असते.. तर वेल जमिनीवर पसरू दिल्यास फळांची नासाडी होते. आणि फळांचा दर्जा घसरतो. अशा वेळी मंडप करून वेल मंडपावर सोडावेत. मंडप उभारणीचे काम शक्यतो वेल १ ते १.५ फूट उंचीचे होण्याअगोदर पूर्ण करणे गरजेचे आहे.
  4. बगलफुट काढणे: वेल वाढत असताना बगलफुट आणि तणावे काढावेत. वेल ५ फूट उंचीचा झाल्यावर बगलफुट काढणे थांबवावे व मंडपावर वेली वाढू द्याव्यात. म्हणजे दर्जेदार उत्पादन मिळते. वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड केल्यापासून २० ते २५ दिवसांनी वेल ताटी किंवा मंडपावर सोडण्यासाठी सुतळीच्या साहाय्याने वर चढवावेत तसेच मंडप पद्धतीमध्ये वेल मंडपावर पोहचल्यानंतर सर्व बगल फुटी काढाव्यात आणि ताटी पद्धतीमध्ये व पहिल्या तारेपर्यंत वेलीवरच्या बगलफुटी काढून टाकाव्यात त्यानंतर बगलफुटी/फांद्या काढू नये.

खत आणि पाणी व्यवस्थापन: 



वेलवर्गीय भाजीपाला पिकांना २५ टन चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी द्यावे. तसेच शिफारशीनुसार अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या अगोदर जमिनीत मिसळावे, उरलेले नत्र लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी पिकास द्यावे. त्याच बरोबर काही पाण्यात विरघळणारे १९:१९:१९ हे विद्राव्य खत ५ ग्रॅम/लीटर पाण्यात मिसळून २ ते ३ फवारणी द्याव्यात. तसेच प्रत्येक तोडणीनंतर नत्राचा हप्ता द्यावा.


      वेलवर्गीय भाज्या जरी पाण्याचा ताण सहन करू शकत असल्या तरी आर्थिकदृष्ट्या परवडणारे उत्पादन मिळविण्याच्या वेलवर्गीय पिकांना पाण्याचे व्यवस्थापन करताना वातावरणातील तापमान, जमिनीचा मगदूर आणि पिकाची अवस्था यानुसार पाणी द्यावे. शक्यतो ८ ते १० दिवसांनी पिकाला पाणी द्यावे. शक्य असल्यास ठिबक सिंचन पद्धतीने पिकाला पाणी द्यावे. प्रति दिवस १ तास संच चालू ठेवावा. पाऊस जास्त झाल्यास पाण्याचे चर काढून जादा पाणी काढून द्यावे जेणेकरून खोडाजवळ पाणी साचून राहणार नाही तसेच पिकाची वाढीची अवस्था, फुलधारणा, फळधारणा या अवस्थेत कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. अन्यथा वाढीवर, फळ पोसण्यावर परिणाम होतो आणि उत्पादनामध्ये घट येते.

      संजीवकाचा वापर : 

      वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये नर आणि मादी फुले येतात त्यामध्ये नर फुलांचे प्रमाण जास्त आणि मादी फुलाचे प्रमाण कमी असते आणि आपणास मादी फुलापासून फळधारणा होऊन र फळे मिळतात. त्यासाठी मादी फुले जास्त आणि नर फुले कमी असावे न लागते त्यासाठी काही संजीवकाचा वापर करता येतो. उदा. काकडी पिकामध्ये इथेल १५० ते २०० पी.पी.एम. काकडी पीक दोन आणि चार पानावर असताना फवारणी केली तर नर फुलाचे प्रमाण कमी होऊन मादी फुलांचे प्रमाण वाढते. परंतु सध्या बाजारामध्ये काकडीच्या जाती उपलब्ध आहेत. त्यावर संजीवकाची फवारणी करू नये; कारण या जातीमध्ये फक्त मादी फुले येतात आणि संजीवकाची फवारणी केल्यास नर फुले येऊ शकतात.

      पिकांची काढणी : 

      वेलवर्गीय भाज्यांची काढणी अगदी वेळेवर करणे गिन्हाइकाच्या दृष्टीने फार महत्त्वाची असते पूर्ण वाढ झालेली परंतु कोवळी फळे काढली असता त्यांना चांगला बाजारभाव मिळतो. दुधी भोपळा, दोडका, कारली, घोसाळी यांची फळे अशा पद्धतीने तोडली तर बाजारपेठेत चांगला उठाव होतो.

      दुधी भोपळा या फळांची तोडणी फळे कोवळी असताना करावी लागते. फळांची तोडणी दिवसाआड करावी लागते. फळ काढताना कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. तोडलेली चांगली फळे पुठ्ठ्याच्या खोक्यात घालून पॅकिंग करावीत व बाजारपेठेत पाठवावीत अशा फळांना बाजारभाव चांगला मिळतो.

      कारली आणि दोडका या पिकात साधारणपणे ६० दिवसानंतर पहिला तोडा निघतो व त्यानंतर ८ ते १० दिवसाच्या अंतराने तोडे होतात. वेलीची चांगली निगा ठेवली तर १५ ते १७ तोडे मिळू शकतात. फार कोवळी फळे तोडू नयेत. फळे तोडल्यानंतर लगेच सावलीत साठवावीत. काकडीच्या फळांची तोडणी बाजारातील मागणीप्रमाणे दैनंदिन वापरानुसार करणे आवश्यक असते. काकडी कोवळी लुसलुशीत असतानाच तोडणी करावी. साधारणत: लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी फळे यायला सुरुवात झाल्यावर दर दोन ते चार दिवसांनी फळे तोडावी लागतात कलिंगडाची फळे लागवडीनंतर जातिपरत्वे ९० ते १२० दिवसांनी काढणीस तयार होतात. फळांच्या जमिनीलगतचा भाग पांढरट पिवळसर होणे, फळ हाताने दाबले असता कर्रर असा आवाज येणे, देठाजवळील बाळी पूर्ण सुकणे, फळांवर बोटाने वाजविले असता बदबद आवाज येणे व देठाजवळील लव नाहीशी होणे ही सर्व लक्षणे फळ काढणीस योग्य आहेत असे दर्शवितात.

      खरबुजाचे फळ पिकले म्हणजे थोडासा धक्का लागला तर ते देठापासून वेगळे होते फळ तयार झाल्याचे हे निश्चित लक्षण समजले जाते. सालीवर जाळी असलेल्या जातीत जाळीच्या मधली जागा पिवळसर झाली की फळ पिकल्याची खूण समजावी तांबडा भोपळा हे पीक उत्तम साठवण क्षमतेमुळे शेतकऱ्यांपर्यंत लोकप्रिय आहे. तांबड्या भोपळ्याचे फळ पूर्ण पक्व झाल्यानंतर फळाचा रंग बदलतो त्यानंतर फळ देठासह मोडावे व सावलीमध्ये साठवणीसाठी ठेवावे. 

      thank you 🤗

      टिप्पणी पोस्ट करा

      0 टिप्पण्या