गहू

 


गहू

सन २०१९-२० मध्ये महाराष्ट्रात सुमारे १३.५२ लाख हेक्टर क्षेत्र गव्हाखाली होते, तर विदर्भात ३.७१ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये गहू पीक घेतल्या गेले. त्यापासून विदर्भाला ६.६५ दशलक्ष टन गहू उत्पादन मिळाले. विदर्भातील गव्हाची प्रति हेक्टरी उत्पादकता भारतातील गहू उत्पादकतेपेक्षा फारच कमी (म्हणजे १७.०८ क्विंटल/हे.इतकी) आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे विदर्भातील उष्ण हवामान त्याचप्रमाणे तापमानातील सतत आढळून येणारे बदल होत. असे असले तरी गव्हाच्या सुधारित आणि शिफारस केलेल्या वाणांचा वापर आणि योग्य लागवड तंत्राचा अवलंब केल्यास गव्हाचे उत्पादनात हमखास वाढ होऊ शकते.

लागवड तंत्र

जमीन व हवामान बागायती गव्हास पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी प्रतीची जमीन निवडावी. थंडीचे दिवस जितके जास्त मिळतील तितके पीक वाढीस पोषक ठरून उत्पादनात वाढ होते. गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता थंडीचे किमान १०० दिवस मिळणे आवश्यक आहे.

पूर्वमशागत : 

 खरीप पिकानंतर खोल नांगरणी करून व वखराच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.. उताराला आडवे सारे पाडून गहू पेरणीसाठी जमीन तयार ठेवावी.

भरखते: 

पेरणीपूर्वी जमिनीत किमान हेक्टरी ३० गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंम्पोस्ट खत मिसळावे.

वाण : 

कोरडवाहू, बागायती वेळेवर आणि बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारस केलेल्या वाणांची माहिती पुढील तक्त्यात दिलेली आहे.

गहू पिकाच्या 'पीडीकेव्ही सरदार' या वाणाचे अधिक उत्पादन व अधिक मिळकतीसाठी पेरणी २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबरच्या दरम्यान करावी अशी शिफारस प्रसारीत करण्यात आली आहे.

पेरणीची योग्य वेळ : 

कोरडवाहू गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तर बागायती गव्हाची वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी. पेरणीस उशीर झाल्यास १५ डिसेंबरपर्यंत पेरणी करूनही बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते.

वियाण्याचे प्रमाण : 

कोरडवाहू पेरणीसाठी प्रति हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. बागायती वेळेवर पेरणीसाठी १०० किलो प्रति हेक्टरी (एचडी २१८९ किंवा पूर्णा यासारख्या जाड दाण्यांच्या वाणांसाठी बियाण्याचे प्रमाण १२५ किलो प्रति हेक्टरी असावे.), बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १५० किलो बियाणे वापरावे.

विज प्रक्रिया:

 पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा व्हिटावॅक्स ७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावल्यानंतर जीवाणू संवर्धन लावावे.

पेरणी

 कोरडवाहू गव्हाची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असेल तरच करावी आणि बियाणे ओलाव्यात पडेल याची संपूर्ण  काळजी घ्यावी. बागायती पेरणीचे वेळी जमिनीत पुरेशी ओल नसल्यास ओलीत करून पेरणी करावी. कोरडवाहू व बागायती वेळेवर पेरणीसाठी दोन ओळीत २३ सें.मी. अंतर ठेवावे तर बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळीत १५ किंवा १८ सें.मी. अंतर ठेवावे. गव्हाचे बियाणे पेरणीच्या वेळी ५ ते ६ सें.मी. पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.

रासायनिक खते 

कोरडवाहूसाठी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीचे वेळी द्यावे. बागायती वेळेवर पेरणीसाठी प्रति हेक्टरी १०० ते १२० किलो नत्र, ५० ते ६० किलो स्फुरद व ५० ते ६० किलो पालाश व बागायती उशिरा पेरणीसाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश एवढ्या रासायनिक खताची मात्रा द्यावी. बागायती वेळेवर व उशिरा या दोन्ही पेरण्यासाठी नत्राची अर्धी मात्रा तसेच संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व अलेली नत्राची अर्धी मात्रा पाण्याच्या पहिल्या पाण्याच्या पाळीचे वेळी (१८ ते २० दिवसानंतर) द्यावो मर्यादित पाणी पुरवठा असल्यास ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणी सोबतच द्यावे.

टीप :  

  • माती परीक्षण करून आवश्यकतेप्रमाणे पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत.
  •  अॅझोटोबॅक्टर हे नत्रस्थिरीकरण करणारे जिवाणू संवर्धन आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत (पी.एम.बी.) प्रत्येकी २५० ग्रॅम प्रति १०-१२ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळून लावल्यास उत्पादनात वाढ मिळते.

आंतरमशागत :

 पेरणीपासून ३० ते ४० दिवसाचे आत तणांचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा निंदण करावे. अरूंद पानी तणांच्या बंदोबस्तासाठी २,४- डी (सोडियम सॉल्ट) या तणनाशकाची प्रति हेक्टरी १ किलो क्रियाशील मूलद्रव्य ५०० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी फवारणी करावी. त्याचप्रमाणे गहू पिकातील रुंद पानांच्या तणांच्या बंदोबस्तासाठी अलग्रीप (मेटसफ्युरॉन मेथाईल) या तणनाशकाची प्रती हेक्टरी ४ ग्रॅम क्रियाशील घटक किंवा २० ग्रॅम औषधाची ५०० लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर २५-३० दिवसापर्यंत फवारणी करावी.

ओलीत व्यवस्थापन:

गहू पीक वाढीच्या नाजूक अवस्थांमध्ये पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. गव्हाच्या वाढीच्या नाजूक अवस्था खालील तक्त्यात दर्शविल्या आहेत. त्याप्रमाणे ओलीत करावे. पेरणीपूर्वी शेताला पाणी देणे आवश्यक आहे.

मर्यादित पाणी पुरवठा : 

गहू संशोधन विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला येथे मागील वर्षातील मर्यादित पाणी पुरवठा प्रयोगामध्ये एकेएडब्ल्यु ४६२७ या वाणाने सर्वाधिक उत्पादन दिले.

कापणी व मळणी: 

पीक पक्व होताच कापणी करावी. शेतामध्ये योग्य जागेवर गंजी लावावी. मळणी यंत्राने मळणी करताना दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या