सोयाबीन

 


सोयाबीन

नियोजनपूर्वक शेतीत सोयाबीन हे एक आशादायी पीक आहे. सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण २० टक्के व प्रथिनाचे प्रमाण ४० टक्के आहे. खाद्यतेलात सोयाबीनला महत्वाचे स्थान प्राप्त झाले असून त्यामध्ये सोयाबीनचा मोठा वाटा आहे. सोयाबीन द्विदलवर्गीय पीक असल्यामुळे त्याच्या मुळावरील गाठीत असणारे जिवाणू हवेतील नैसर्गिक नत्राचे स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी नत्र उपलब्ध करून देते. सोयाबीनच्या झाडाचा पालापाचोळा (अवशेष) जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. आंतरपिक व दुबारपिक पध्दतीत सोयाबीन अतिशय उपयुक्त पीक आहे. पिकाच्या फेरपालटीमध्ये सोयाबीनला महत्वाचे स्थान आहे. सोयाबीन नंतर रबी हंगामात गहू घ्यावयाचा असल्यास गव्हाचे पिकास शिफारस केलेली पूर्ण खत मात्रा द्यावी.


लागवड तंत्र: 

हवामान: 

सोयाबीनचे पीक २५ ते ३३ अंश सेल्सियस तापमानात चांगल्या प्रकारे वाढू शकते. ज्या भागात ७०० ते १००० मि.मी. दरम्यान पर्जन्यमान आहे तेथे सोयाबीन उत्पादन चांगले येऊ शकते.

जमीन :

मध्यम भारी प्रतिची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, आम्ल-विम्ल निर्देशांक ६.५ ते ७.५ पर्यंत असणारी जमीन या पिकाच्या वाढीस अतिशय उत्तम.

पूर्वमशागत व भरखते :

जमिनीची १५ ते २० सें.मी. खोल नांगरट तीन वर्षातून एकदा करून व दोन ते तीन वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी. हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कम्पोस्ट खत वापरून नंतर व्यवस्थित जमिनीत मिसळण्यासाठी वखराची पाळी द्यावी. पेरणीपूर्वी एक वखराची पाळी (जांभूळवाही) दिली असता तणांची तीव्रता कमी होते.

बीजप्रक्रिया : 

 बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी कार्बोक्सीन ३७.५ टक्के थायरम ३७.५ टक्के (मित्र घटक) ची ७५ टक्के डी. एस. चौ ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी.

जिवाणू खते : 

रायझोबीयम जपोनिकम व पी.एस.बी. प्रत्येकी २००-२५० ग्रॅम प्रति १०-१५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी २-३ तास अगोदर लाऊन सावलीमध्ये वाळवावे. बीज प्रक्रिया करताना बियाणे जोरात घासू नये तसेच प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर जिवाणू खताची बीज प्रक्रिया करावी.


पेरणीची वेळ व पध्दत:

 १) पुरेसा पाऊस (७५ ते १०० मि.मी.) झाल्यानंतर जूनचा तिसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या दरम्यान पेरणी आटोपावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादन कमी होते. 

२) पेरणी सरत्याने करावी, तिफणीचा वापर टाळावा. पेरणी करतांना पट्टा पद्धत वापरावी. 

३) सोयाबीनचे बियाणे ४ सें.मी. पेक्षा खोल पेरू नये अन्यथा बियाणे कुडून उगवण कमी होते.

 ४) दोन ओळीतील व रोपट्यामधील अंतर ३० X ८ से.मी. किंवा ४५ X ५ सें.मी. ठेवावे, जेणेकरून रोपांची संख्या हेक्टरी ४ ते ४.५ लाख एवढी राहील.

 ५) उताराला आडवी तसेच पूर्व-पश्चिम पेरणी करावी. 

बीयाण्याचे प्रमाण : 

१) किमान ७० टक्के उगवणशक्तिचे प्रति हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे. २) स्वत: जवळचे विवागे वापरायचे असल्यास घरच्या घरी उगवणशकी तपासून नंतरच पेरणी करावी.

खत व्यवस्थापन : 

रासायनिक खतांची संपूर्ण खत मात्रा ३० किलो नत्र व ७५ किलो स्फुरद व ३० किलो पालाश पेरणी सोबतच द्यावीत. एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनेच्या दृष्टीने पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी ५ टन चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. बियाण्यास जिवाणू खताची विज प्रक्रिया करावी आणि पेरणी सोबत रासायनिक खताची अर्धी मात्रा १५ किलो नत्र, ३७.५ किलो स्फुरद व १५ किलो पालाश द्यावे. एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापनेमुळे जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यास मदत होते. माती परिक्षणानुसार आवश्यकता भासल्यास ३० किलो पालाश द्यावे व सुक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीतून अथवा जमिनीतून द्यावे

मुलस्थानी जलसंवर्धन:

 १) सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादन, आर्थिक मिळकत व मुलस्थानी जलसंधारणासाठी पेरणीनंतर अंदाजे ३० दिवसांनी सोयाबीनच्या ३ ओळी नंतर सरी काढावी. २) सोयाबीन पिकाची पट्टा पध्दतीने (६ ओळ सोयाबीन व त्यानंतर १ ओळ रिकामी) पेरणी केल्यास रिकाम्या ओळीत सरी पाडून मुलस्थानी जलसंवर्धन करता येईल. (अ.भा.स.स.प्र. अंतर्गत शिफारस)

आंतरपीक पध्दती :

१) मध्यम भारी जमिनीत तूर पिकामध्ये सोयाबीन १:२ किंवा २:४ या प्रमाणात आंतरपीक घेतल्यास निव्वळ तुरीपेक्षा फायदेशीर आढळून आले आहे. तसेच कपाशी पिकामध्ये लवकर येणारे सोयाबीनचे १:१ किंवा १:२ हे प्रमाण फायदेशीर आहे. २) कोरडवाहू शेती पध्दतीत धान्य, चारा व कडधान्याची गरज भागविण्याकरिता आणि अधिक आर्थिक लाभ मिळण्याकरिता सोयाबीन ज्वारी + तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पध्दतीत ६:२:१ किंवा ९:२:१ या ओळींच्या प्रमाणात पेरणी करावी,

आंतरमशागत :

डवरणीच्या दोन पाळ्या द्याव्यात. पहिली डवरणी पेरणीनंतर १५ ते २० दिवसानी व दुसरी ३० ते ३५ दिवसाच्या दरम्यान आणि आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी करावी. दुसऱ्या डवरणीच्या वेळी डवऱ्याला दोरी गुंडाळून डवरणी करावी यामुळे पिकाच्या रांगेला मातीची भर बसेल आणि सन्या पडल्यामुळे मुलस्थानी जलसंवर्धन होईल.

 सोयाबीनचे अधिक उत्पन्न मिळण्यासाठी शिफारस केलेल्या खतमात्रेसोबत पेरणीनंतर ५० व ७० दिवसानी २५ (१००) लिटर पाण्यात २ किलो युरिया) युरियाची फवारणी करावी किंवा शेंगा धरण्याच्या अवस्थेत २ टक्के १९:१९:१९ (पाण्यात विरघळणारे खत) नत्रः स्फुरदः पालाश ची फवारणी करावी.

तण व्यवस्थापन : 

१) पेरणीपूर्व फ्लुक्लोरॅलीन (बासालीन ४५ %) १ किलो क्रि.घ/हे (२ लि./हे.) तणनाशक ६००-७०० लिटर : पाण्यात मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी व वखराची पाळी देऊन जमिनीत मिसळून द्यावे.

२) उगवणपूर्व पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकूर पृष्ठभागावर येण्याआधी मेटाक्लोर (ड्युल ५०%) १ किलो क्रि.घ./हे (२ लि./हे) किंवा पेंडिमेथॅलीन (स्टॉम्प ३०%) ४ लि./हे. ची वरील प्रमाणे फवारणी करावी.

३) उगवण पश्चात उगवण पश्चात १० दिवसांनी इमॅजिथायपर ७५ ग्रॅम, क्रि.घ./हे. फवारणी करून पेरणी नंतर २५ दिवसांनी एक डवरणी करून प्रभावीपणे तण नियंत्रण करता येईल. (संयुक्त कृषि संशोधन विकास समिती अंतर्गत शिफारस) ओलीत व्यवस्थापन : पीक फुलोऱ्यावर व शेंगात दाणे भरत असलेल्या अवस्थेत असतांना पावसात खंड पडल्यास दोन संरक्षीत ओलीत द्यावे.

कापणी: 

पाने पिवळी पडून गळू लागतात व शेंगाचा रंग भुरकट, तांबूस किंवा काळपट होतो, तेव्हा पीक कापणीस आले आहे असे समजावे. कापणीचे वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५-१७ टक्के असावे. कापणीनंतर पीक ताबडतोब खळ्यावर ठेवावे, जेणे करून पावसापासून पिकाचे संरक्षण होईल व बियाण्याची प्रत खराब होणार नाही.


मळणी : सोयाबीनची मळणी करताना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १३-१५ टक्के असावे, आणि मळणी यंत्राच्या ड्रमची गती ३५०-४०० फेरे प्रति मिनिट (आर.पी.एम) या दरम्यान असावी जेणेकरून बियाण्याला इजा पोहोचणार नाही आणि उगवणशक्तिवर विपरीत परिणाम होणार नाही.


साठवणूक: 

साठवणूक करताना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १० ते १२ टक्केपेक्षा जास्त नसावे. यासाठी बियाणे उन्हात वाळवून तागाचे पोत्यात भरावे. पोते रचताना पोत्यावर जास्त भार पडणार नाही अशा रीतीने पोते रचावे. साठवणुकीची जागा स्वच्छ व कोरडी असावी. 

किड्यांचा/ उंदरांचा उपद्रव टाळण्याकरीता विशेष काळजी घ्यावी जेणे करून बियाण्याची प्रत व उगवणशकी उत्तम ठेवणे शक्य होईल.


हेक्टरी उत्पादन : 

कोरडवाहू स्थितीत प्रति हेक्टरी १५ ते २५ किंटल पर्यंत उत्पादन मिळते.

.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या