एरंडी - लागवड तंत्रज्ञान -पीक संरक्षण

 


हवामान: 

एरंडी हे एक उष्ण कटिबंधीय पीक असून ते निरनिराळ्या हंगामात येऊ शकते. तसेच कमी पाऊस किंवा अवर्षणग्रस्त भागातही हे पीक येऊ शकते.


जमीन या पिकाकरीता सर्व प्रकारच्या हलक्या, मध्यम व भारी जमिनी उपयुक्त आहेत. परंतू पाणथळ किंवा विम्लयुक्त जमिनी अजिवात उपयुक्त नाहीत.


पूर्वमशागत :

 या पिकाच्या मुळ्या खोलवर जात असल्यामुळे जमिनीची नांगरणी खोल करावी. नांगरणीनंतर वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन तयार करावी. प्रति हेक्टरी पाच ते दहा टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटची वखराची पाळी देते वेळेस जमिनीत मिसळून द्यावे.


आंतरपिक

 हे पीक एरंडी तूर (१:१), एंडी उडीद (१:२) किंवा एरंडी-भुईमूग (१:५) या आंतरपिक पध्दतीमध्ये घेता येते.

 पेरणी

 पेरणी सर्वसाधारणपणे तिफणीने किंवा टोकण पध्दतीने करावी. तिफणीने पेरणी केल्यास विरळणी करून हेक्टरी झाडांची संख्या शिफारसीनुसार कायम ठेवावी. स्थानिक परिस्थिती व आवश्यकतेनुसार ओळीतील अंतर ९० ते १२० सें. मी. आणि दोन झाडांतील अंतर ४५ ते ६० सें.मी. ठेवावे. 

पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करून एकच्चनोमदार रोपटे ठेवावे बियाणे जमिनीत खोलवर (५-६ सें. मी.) पडेल याची काळजी घ्यावी. 

या पिकाची पेरणी जमिनीत पुरेशी ओल असतांना व वापसा झाल्यानंतर इतर खरीप पिकासोबत साधारणत: १५ जुलैपर्यंत करावी. आपात्कालीन परिस्थितीमध्ये उशिरा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करण्यास हरकत नाही. अर्थरबी हंगामात सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात पेरणी करावी.

बियाणे प्रमाण : 

प्रति हेक्टरी १०-१२ किलो बियाणे (तिफण पध्दत) प्रति हेक्टरी ८-१० किलो बियाणे (टोकण पध्दत)

 बीज प्रक्रिया :

पेरणीपूर्वी थायरम ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी. 

खते : 

कोरडवाहू लागवडीसाठी प्रति हेक्टरी ६० किलो नत्र व ३० किलो स्फुरदची मात्रा शिफारस केलेली आहे. यापैकी नत्रयुक्त खताची अर्धी मात्रा व स्फुरदाची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी जमिनीमध्ये मिसळून द्यावी. राहीलेली नत्रयुक्त खताची अर्धी मात्रा पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी (फुले येण्यापूर्वी) द्यावी. बागायती परिस्थितीमध्ये प्रति हेक्टरी १२० किलो नत्र, ४० किलो स्फुरद याची शिफारस करण्यात आलेली आहे. पेरणीच्या वेळी ६० किलो नत्र व संपूर्ण स्फूरद देण्यात यावे व राहीलेले २० किलो नत्र पेरणीनंतर ४५ दिवसांनी द्यावे. आवश्यकतेनुसार पालाशयुक्त खताची मात्रा प्रति हेक्टरी ४० किलो या प्रमाणे पेरणीच्या वेळी द्यावी.

आंतरमशागत: 

आवश्यकते नुसार डवरणी व निंदणाच्या पाळ्या द्याव्यात. बागायती पिकात तणाचा जास्त प्रादुर्भाव होत असल्यामुळे डवरणी व निंदणाच्या पाळ्यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करून पीक तणविरहीत ठेवावे.


पीक संरक्षण

 मुख्यत्वेकरून उंट अळी व बोंडे पोखरणारी अळी या किडीमुळे या पिकाचे अतोनात नुकसान होते. या किडीच्या 7 नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही १४ मि.ली. किंवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १४ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस २५. टक्के प्रवाही २० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. तसेच रोगामध्ये मर. मुळकूज व बोट्रायटोस रॉट हे प्रामुख्याने नुकसान करतात. मर व मुळकूज रोग प्रतिबंधासाठी पिकांची फेरपालट करणे आवश्यक आहे. तसेच शेतात पाणी साचू देऊ नये. रोगग्रस्त झाडे उपटून त्याचा नायनाट करावा. बोट्रायटोस रॉट या रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक वाणांचा वापर करावा. 

कापणी व मळणी :

कापणी साधारणत दोन वेळा करावी. पहिली कापणी मुख्य घड परिपक्व झाल्यावर साधाणत: ११० ते १२० दिवसांनी करावी. दुसरी कापणी झाडावरील सर्व घड परिपक्व झाल्यानंतर साधारणत: १८० दिवसांनी करावी. कापणी केलेले घड ४ ते ५ दिवस पूर्णपणे उन्हात वाळविल्यानंतर काठीने किंवा लाकडी ठोकळ्याने बडवून बिया वेगळ्या करून उपणून स्वच्छ कराव्यात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या