जमीन :
मोहरीच्या सलग पिकासाठी मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीची निवड करावी. तसेच पाण्याचा चांगला निचरा होणे, पिकाच्या जोमदार वाढीच्या दृष्टीने फार महत्वाचे ठरते.
पूर्वमशागत:
खरीप पिकाची कापणी झाल्यानंतर जमीन नांगरून, वखरून तयार करावी. ओलिताखाली पीक घ्यावयाचे : झाल्यास वखराच्या किंवा सारा यंत्राच्या सहाय्याने 'सारे' पाडावेत. त्यामुळे पाणी चांगले समप्रमाणात उपयोगात आणले जाते.
बीज प्रक्रिया:
पेरणीपूर्वी थायरम ३ ग्रॅम/किलो बियाण्यास चोळावे. पेरणीच्या आधी रात्री बियाणे ओलसर पोत्यात ठेवले असता उगवण चांगली होते.
पेरणीची वेळ :
ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात.
पेरणीची पध्दत:
५ किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. कोरडवाहू मोहरीची पेरणी जमिनीत ओल असतांना ४५ सें.मी. अंतर ठेवून करावी. या पिकाचे बियाणे आकाराने लहान असल्यामुळे मोहरीच्या आकाराची वाळू समप्रमाणात मिसळून नंतर पेरणी करावी. त्यामुळे बियाणे सर्व क्षेत्रात सारखे पडण्यास मदत होते व पीक दाट होत नाही. बियाणे ३ ते ४ सें.मी. खोल ओलीत पडेल अशा बेताने पेरावे. बियाणे जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. ओलिताखालील मोहरीच्या पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वापसा येताच पेरणी करावी. पाणी देण्यासाठी 'सारे' काढावेत.
विरळणी/खाडे भरणे:
पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करावी. यावेळी झाडातील अंतर १० ते १५ सें.मी. ठेवावे, म्हणजे शेतात हेक्टरी १.५ ते २.२ लाख रोपांची संख्या राहील.
आंतरपिके : गव्हाबरोबर आंतरपीक ९:१ या प्रमाणात ओळीमध्ये पेरणी केल्यास अधिक फायदेशीर ठरते असे या केंद्रावरील प्रयोगात दिसून आले.
रासायनिक खतांचे व्यवस्थापन :
निश्चित ओलीताची सोय असल्यास हेक्टरी ५० किलो नत्र व ४० किलो स्फुरदाची मात्रा घ्यावी. त्यापैकी २५ किलो नत्र (५४ किलो युरिया) व ४० किलो स्फुरद (२५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) पेरणीच्या वेळेस द्यावे व उर्वरीत २५ किलो नत्र (५४ किलो युरिया) पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी पहिल्या ओलिताच्या वेळी द्यावी.
उत्पादन वाढीसाठी प्रति हेक्टरी २० किलो गंधक आणि १ किलो बोरॉन पेरणीच्या वेळीच द्यावे. कोरडवाहू परिस्थितीत प्रति हेक्टरी ४० किलो नत्र (८७ किलो युरिया) व २० किलो स्फुरद (१२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) द्यावे. कोरडवाहू मोहरी पिकास १% युरिया ५०% फुलोरा अवस्थेत फवारणी केल्याने उत्पादनात वाढ आढळून आली.
आंतरमशागत :
उगवणीनंतर ५० दिवसांच्या काळात मोहरी पिकाच्या प्रभावी तण नियंत्रण, अधिक उत्पादन व अधिक आर्थिक मिळकतीकरीता पेरणीपासून २० व ४० दिवसांनी २ निंदण व २ डवरणी करण्याची किंवा ऑक्सीडायरजील (८० टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी) ९० ग्रॅम क्रियाशील घटक किंवा पेंडीमिथॅलिन (३० टक्के ई.सी.) १ किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी उगवण पूर्व फवारणी करावे.
ओलिताचे व्यवस्थापन :
मोहरी हे पीक ओलीताखाली व कोरडवाहू दोन्ही परिस्थितीत घेता येते. निश्चित ओलीताची सोय असल्यास उगवणीनंतर २५ ते ३० दिवसाच्या अंतराने ओलीताच्या तीन पाळ्या द्याव्या. दोनच ओलीताच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पेरणीनंतर एक महिन्याने पहिले व पीक फुलांवर असतांना दुसरे ओलित करावे. एकच ओलीत करणे शक्य असल्यास पीक फुलावर असतांना ओलित करावे.
काढणी व मळणी:
झाडावरील शेंगा ७५ टक्के पिवळ्या पडल्यानंतर व शेंगातील दाणे टणक होऊ लागताच मोहरी पीक काढणीस आले असे समजावे. काढणी योग्यवेळी करावी. जमिनीलगत कापणी करून लहान ढीग करून ७-८ दिवस शेतातच वाळू द्यावे. नंतर लगेच बैलाच्या पायाखाली तुडवून काठीने बडवून मळणी करावी. मोहरीच्या पिकापासून हेक्टरी ८ ते १२ क्विंटल उत्पादन होते.
0 टिप्पण्या
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा,