करडी - लागवड तंत्रज्ञान

 


करडी हे रबी हंगामातील अल्प खर्चिक व महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. अवर्षणावर मात करण्याची क्षमता या पिकात आधिक्याने असल्यामुळे इतर स्त्री पिकांपेक्षा कोरडवाहू क्षेत्राकरिता हे पीक एक वरदान आहे. पण ओलीताखाली सुध्दा करडी चांगली येते म्हणून ओलिताच्या करडीचे क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. फक्त तीन ओलित दिल्यास उत्पादन दुप्पट होते.

 हवामान:

 या पिकाला थंड हवामान मानवते. पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत जास्त पाऊस आणि पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही. त्याचप्रमाणे अति उष्णतामानाचा आणि अति थंडीचा या पिकावर विपरीत परिणाम होतो. 

जमीन :

या पिकास मध्यम ते खोल, ओल टिकवून ठेवणारी, परंतु चांगला निचरा असणारी जमीन निवडावी. क्षारयुक्त जमिनीत सुद्धा हे पीक घेता येते.

पूर्वमशागत :

करडीचे एकच पीक घ्यावयाचे ठरविल्यास उन्हाळ्यात एक वेळ नांगरणी, वखरणीच्या २-३ पाळ्या देऊन, काढीकचरा वेचून जमीन चांगली भुसभुशीत करावी. पावसाळ्यात दर पंधरा दिवसांनी वखरणी करून पाणी जिरवून नियंत्रण करावे. दूबार पीक घ्यावयाचे असल्यास खरीप पिकाचे काढणीनंतर कमीत कमी मशागतीने जमीन पेरणीस तयार करावी, जेणे करून जमिनीत ओलावा टिकून राहील, म्हणजे उगवण चांगली होऊन रोपसंख्या पुरेशी मिळेल 

भरखते :

पूर्वमशागत करतांना शेणखत/कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन शेवटचे वखरणी अगोदर जमिनीत मिसळावे. 

बियाणे :

भारी जमिनीसाठी हेक्टरी १० किलो, तरं मध्यम जमिनीसाठी हेक्टरी १२-१५ किलो बियाणे वापरावे. संकरित वाणाचे ७.५ किलो बियाणे वापरावे.

बीज प्रक्रिया :

पेरणीपूर्वी बियाण्यास अॅझोटोबॅक्टर अधिक पीएसबी जिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया (प्रत्येकी २०० ग्रॅम : प्रति १० किलो बियाण्यास) करावी. मर प्रवण भागात मर रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी किंवा शेणखतातून जमिनीत मिसळावे.

पेरणीची वेळ : 

करडीची पेरणी सप्टेंबरच्या चवथ्या ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो व उत्पादन चांगले मिळते. ओलिताखालील करडीची पेरणी ऑक्टोबर शेवटपर्यंत करण्यास हरकत नाही. उशिरात उशीरा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करावी. बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून पेरणी केल्यास उगवण लवकर व चांगली होते.

पेरणीची पध्दत:

 पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बियाणे व खते एकाचवेळी देता येतील. पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. ठेवावे.

आंतरपिके : 

करडी पीक सलग न घेता हरभरा, जवस आंतरपीक पध्दतीमध्ये करडी हरभरा ६:३ ओळी किंवा करडी + जवस ३:३ ओळी या प्रमाणात घ्यावे.

रासायनिक खत मात्रा, वेळ

 हे पीक रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देते. कोरडवाहू करडी पिकास पेरणीसोबत ४०

किलो नत्र (१९४ किलो अमोनियम सल्फेट किंवा ८७ किलो युरिया) व २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर

फॉस्फेट) प्रति हेक्टर द्यावे.

विरळणी :

 या पिकाची विरळणी उगवणीनंतर १०-१२ दिवसांनी करून दोन रोपात २० ते ३० सें.मी. अंतर राखावे. हेक्टरी झाडांची संख्या ७५,००० ते १ लाख पर्यंत ठेवावी.

 आंतरमशागत : 

आवश्यकतेनुसार १-२ वेळा निंदणी व डवरणी करून जमीन तणविरहीत व भुसभुशीत केल्याने ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

तण व्यवस्थापन :

 जेथे मजुरांची चणचण आहे तेथे ओलिताखालील करडीमध्ये तणनाशकाची गरज भासल्यास वापर करावा. त्यासाठी पेरणीपूर्वी फ्लुक्लोरॅलीन १ किलो क्रियाशील घटक (२ लिटर बासालीन) प्रति हेक्टरी ६०० ते ७०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.


ओलीत व्यवस्थापन : 

जेथे ओलिताची सोय आहे तेथे या पिकास पेरणीनंतर ३०, ५० आणि ६५ दिवसांनी ओलिताच्या तीन पाळ्या दिल्यास अधिक उत्पन्न मिळते. जेथे एकाच ओलिताची सोय आहे तेथे ५० दिवसांनी, दोन ओलिताची सोय असल्यास ३० व ५० दिवसांनी ओलीत द्यावे. पीक हलक्या जमिनीत घेतल्यास ओलिताच्या ३ ते ५ पाळ्या द्याव्यात. खोल काळ्या जमिनीत अधिक उत्पादन व आर्थिक नफा आणि जास्त पाणी वापर कार्यक्षमता मिळण्याकरीता करडोला पहिले ओलीत वाढीचा अवस्थेत (पेरणी नंतर ३० व्या दिवशी) आणि दुसरे ओलीत दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणीनंतर ८० व्या दिवशी) द्यावे. ओलीत करतांना पिकात जास्त वेळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. करडीला ओलित करण्याकरीता विशिष्ट पध्दत वापरावी. दोन तासाच्या आड दांड काढून दांडानी फक्त पाणी शेवटपर्यंत घेवून जावे. झाडांना पाण्याचा स्पर्श होण्याची किंवा झाडांच्या अगदी बुडाशी पाणी देण्याची गरज नाही.


कापणी व मळणी 

 पिकाची पाने आणि बोंड्या पिवळ्या पडल्यानंतर पिकाची कापणी करावी. त्यानंतर झाडांचे लहान लहान ढिग करून शेतातच वाळण्यासाठी ठेवावे. ढिगातील झाड चांगले वाळल्यानंतर काठीने बडवून किंवा थ्रेशरचे सहाय्याने मळणी करून बी अलग करावे. अलीकडे कंबाईन हारवेस्टरमुळे काढणी सुकर झाली आहे. त्याचा उपयोग करावा. नंतर बी स्वच्छ करून, वाळवून साठवावे.

उत्पादन:

 मध्यम जमिनीत हेक्टरी १० ते १२ क्टिल आणि भारी जमिनीत १४ ते १६ किंटल उत्पादन मिळते. ओलीत केल्यास २० ते २५ किंटल एवढे उत्पादन मिळू शकते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या