खरीप ज्वारी
खरीप ज्वारीची योग्य वेळी पेरणी, संकरित व सुधारित वाणांचा वापर, रासायनिक खतांचा वापर, योग्य वेळी पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण इत्यादी बाबींचा अवलंब केल्यास खरीप ज्वारीचे भरघोस उत्पादन मिळण्यास निश्चितच मदत होईल. त्यासाठी खाली नमूद केलेल्या बाबींचा शेतकऱ्यांनी अवलंब करणे आवश्क आहे.
जमिनीची निवड
चांगला निचरा असलेली व ५.५ ते ८.५ सामू असलेल्या जमिनीत हे पीक घेता येते. चिकण पोयटयाची, मध्यम काळी जमीन खरीप ज्वारीस योग्य आहे.
संकरित वाण
सी.एस.एच.-१ , सी.एस.एच.-५, सी.एस.एच.-६, सी.एस.एच.-९, सी.एस.एच.-१३, सी.एस.एच.-१४, सी.एस.एच.-१६, सी.एस.एच.-१७, सी.एस.एच.-१८, सी.एस.एच.-२१, सी.एस.एच.-२३, एस.पी.एच. १५६७
सुधारित वाण
एस.पी.व्ही. ४६२, सी.एस.व्ही. १३, सी.एस.व्ही. १५, सी.एस.व्ही.-१७, पी.व्ही.के.-८०१, आणि सी.एस.व्ही. -२३, गोड ज्वारी : एस.एस.व्ही.-८४, एच.ई.एस.-४, सी.एस.व्ही. १९ एस.एस., सी.एस.एच.-२२ एस.एस. व ए.के.एस.एस.व्ही. २२
पूर्वमशागत
हिवाळयात किंवा अगोदरचे पीक निघाल्याबरोबर जमिनीची नांगरट करावी. चैत्र-वैशाख महिन्यात पहिली कुळवाची/वखराची खोल पाळी द्यावी. त्यानंतर २ ते ३ वेळा वखराच्या पाळया दयाव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी १० ते१२ गाडया प्रती हेक्टरी शेणखत जमिनीत मिसळावे.
पेरणीची वेळ
नैऋत्य मान्सूनचा चांगला पाऊस झाल्यावर वापसा येताच पेरणी लवकर करावी (शक्यतो जुलैच्या पहिल्या आठवडयात. पाण्याची सोय असल्यास जूनच्या शेवटच्या आठवडयात पेरणी करावी. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव कमी होतो.
रासायनिक खतांचा वापर
खरीप ज्वारीस १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. संपूर्ण स्फुरद, पालाश आणि अर्धे नत्र पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे. खरीप ज्वारीस १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरीलम हे जिवाणू खत चोळावे. त्यामुळे १५ ते २० टक्के उत्पादन वाढते.
पेरणी
पेरणी तिफणीने/दोन चाडयाच्या पाभरीने करावी. दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन रोपातील १५ सें.मी. इतके ठेवावे. पेरणीस हेक्टरी १० किलो सुधारित बियाणे वापरावे.
विरळणी
पहिली विरळणी पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी आणि दुसरी विरळणी पेरणीनंतर २०-२२ दिवसांनी करावी. विरळणीनंतर १.८० लाख पर्यंत योग्य झाडांची संख्या ठेवावी.
आंतरपिके व क्रमवार पिके
पटटा पध्दतीने तूर हे आंतरपीक २:१ या प्रमाणात घ्यावे (दोन ओळी ज्वारीच्या व एक ओळ तुरीची किंवा दोन पाभरी ज्वारीच्या व एक पाभर तुरीची पेरावी). तसेच तूर ऐवजी मूग, उडीद व चवळी यासारखी आंतरपीके देखील घेता येतात.
पाणी व्यवस्थापन
ज्वारीच्या पिकास, पिकाचा जोमदार वाढीचा काळ (२८ ते ३० दिवस), पीक पोटरीत येण्याचा काळ (५० ते ७५ दिवस), फुलो-यात येण्याचा काळ (८० ते ९० दिवस) व दाणे भरण्याचा काळ (९५ ते १०० दिवस) या चार अवस्थेत जरुरीप्रमाणे शक्य झाल्यास पाणी द्यावे. पाणी शक्यतो सारा पध्दतीनेच द्यावे.
आंतरमशागत
खरीपात तणांचा प्रार्दुभाव जास्त असल्यामुळे दोन खुरपण्या व दोन कोळपण्या कराव्यात. खुरपणी व कोळपणी पीक पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांपूर्वी करावी. शक्य झाल्यास ॲट्रॅझीन हे तणनाशक हेक्टरी १ किलो १००० लीटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर परंतु १ बियाणे उगवण्यापूर्वी जमिनीवर सारख्या प्रमाणात फवारावे. तणनाशक फवारल्यानंतर एक निंदणी किंवा कोळपणी करावी.
कापणी व मळणी
कणसाचा दांडा पिवळा झाला म्हणजे पीक तयार झाले असे समजावे. कणसाच्या खालच्या भागातील दाणे टणक झाल्यावर पिकाची काढणी करावी. तसेच कणसातील दाण्याचा खालचा भाग काळा झाला म्हणजे पीक काढणीस तयार होते. कापणीच्या वेळेस साधारणपणे १७ ते १८ टक्के ओलाव्याचे प्रमाण असते. १० ते ११ टक्के सुरक्षित साठवणीसाठी धान्यातील ओलावा असावा.
उत्पादन
सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सुधारित वाणांपासून हेक्टरी २५ ते ३० क्विंटल तर संकरित वाणापासून हेक्टरी ४० ते ४५ क्विटल धान्य उत्पादन येते.
धन्यवाद….
the plant house या पेजला फॉलो करा आणि शेती विषयक सर्व माहिती मिळवा
- जर तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास व शेती संबंधी काही अडचण असेल कमेंट मध्ये जरूर कळवा
- शेतकरी मित्रांनो आपणास कोणतेही पिकाबद्दल अजून कोणती माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये आम्हाला जरूर सुचवा
- अथवा कोणतीही शंका असेल तेही जरूर कळवा …आमचे तज्ञ तुमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सदैव तयार आहे.
0 टिप्पण्या
शेतकरी मित्रांनो तुम्हाला हळद या पिकाबद्दल अजून कोणतीही माहिती हवी असेल तर खाली कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तुम्हाला मिळतील धन्यवाद व फॉलो करा,